नव्या रस्त्याच्या शोधात
मी रेखीन माझीच वाट, चालणार नाही
मळलेल्या वाटांवरून
त्याच त्याच कधी विस्कटलेल्या ,पुसट
झालेल्या,
काही खाच खळग्यानी भरलेल्या,तर काही
अगदीच सपाट ....
नको तेवढ्या गुळगुळीत...
माझी वाट असेल वेगळी, जी जाईल दूर
क्षितिजापार
शोधेल नवी स्वप्ने आणि उठवेल
स्वत:चा ठसा त्यांच्यासाठी ,
ज्यांना वेड आहे साहसाचे, जे भीत
नाहीत जगण्याच्या आव्हानांना
सामोरे जातात ठामपणे टीकांना आणि
शंकांना
कारण त्यांना माहित असते..भेटेल
त्यानाही कधीतरी माझ्यासारखा सहप्रवासी
नवीन वाटा रेखणारा
माणसाचे
जीवन म्हणजेच एक शोधयात्रा! मानवी संस्कृतीचा विकास झाला तो या शोधयात्रेतून! नवीन
आवाहनांना आणि आव्हानानाही सामोरे जाताना अनेकांनी मळलेली पायवाट सोडून दिली आणि अनेक
भटक्यांनी शोधला स्वत:चा रस्ता. नाविन्याची ओढ,जगाच्या आणि स्वत:च्याही
अस्तित्वाबद्दल असलेले कुतूहल, या अनंत अपार विश्वातील माणसाचे असलेले नगण्य स्थान
जे माणला जाणवत होते पण कदाचित मानवत नव्हते. यातून त्याने आपल्या परीने मार्ग
काढला आणि संपूर्ण शक्तीनिशी तो उभा राहत गेला. कवी,कलाकार,तत्वज्ञ,संशोधक,प्रत्येक
दिशा वेगळी प्रत्येकाचा मार्ग वेगळा होता पण गंतव्य स्थान कदाचित एकच होते ते
म्हणजे शोध ...शोध स्वत:चा आपल्या भोवतीच्या परिघाचा त्याला सगळ्याबरोबर एकाकार
होणे ह्वे होते पण आपले वेगळेपण जपत. आत्मशोधाच्या या जाणिवेचे सुंदर वर्णन केलेले आहे ऑनी बेझंट
यांनी. या अवस्थेचे वर्णन करताना त्यांनी म्हंटले आहे माणसाचे अस्तित्व आहे त्या
समुद्रातील पाण्याच्या थेंबासारखे 'drop expanding
into ocean and still keeping its own center'
म्हणजे जणू काही 'पाहावे आपणासी आपण' अशीच अवस्था.हे
घडायचे कसे?
बौद्ध तत्वज्ञानात 'निर्वाण' असा एक शब्द वारंवार येतो. पाली भाषेत त्यालाच 'निब्बान'
म्हंटले आहे. आनंदाने जगायचे असेल तर
बुद्ध व्हा. बुद्धत्व म्हणजे तरी काय? तर जिथे राग, लोभ, द्वेष,प्रेम या भावना एका आनंदात
मिसळून जातात आणि निर्वाण प्राप्तीची वाटचाल सुरु
होते.असीम आनंदाने भरलेल्या मनात प्रकाश असतो तो फक्त ज्ञानदीपाचा . जीवनात
दु:ख नाही अस म्हणायचे धाडस कोण करणार? ते तर बरोबर घेऊन चालावेच लागते.पण याचा
अर्थ असाही नाही की या दु:खापासून मुक्तीच नाही.
ज्यांनी नवतेचा ध्यास घेतला,मळलेल्या वाटांनी जायचे नाकारले त्यांना या दु:खाला टाळता आले नाही असे म्हणतात. तरुण राजराणी
मीरेने सहजपणे विषाचा प्याला तोंडाला लावला.राजपुत्र सिद्धार्थाने दु:ख पाहिले आणि जीवनाचा मार्ग बदलला. ऐश्वर्य पायाशी
असताना या दोघांनी ते उधळून दिले आपल्याला हव्या असलेल्या वाटेवरून चालण्यासाठी ..मग
ज्ञानदेवांचे काय? ज्ञानदेवांनी तर दु:ख अखंड आपल्या खांद्यांवरून वाहिले. अस काय
होते या सगळ्यांमध्ये म्हणून ते साऱ्या
दु:खावर मात करू शकले? कोणत्या ध्यासाने चालत राहिले? आणि त्याच त्याच वाटेवरून
चालणारे तरी कुठे सुखी झाले का?या शोधयात्रेचे उत्तर काय?
डॉ.मनीषा
शेटे
Comments
Post a Comment