पावती मिळाली
कोऱ्या कागदावर त्याने उमटविला एक
कधीही न पुसता येणारा ठसा
आणि चार अक्षरे सहीची ...ही घे
पावती
नि:शब्दपणे मी तो कागद उचलला ती
पावती होती?
की संपलेल्या नात्याची निशाणी !
आजपर्यंत केलेल्या प्रेमाची,वाहिलेल्या वेदनांची झालर होती त्या सुरकुतलेल्या कागदाला,
कागद? कोरड्या मनाने खरडलेल्या सहीच्या आजूबाजूला नव्हती कसलीच निशाणी आपल्या नात्याची....
व्यावहारिक जगात एखादी गोष्ट अथवा
व्यवहार पूर्ण झाल्यावर आपल्याला पावती मिळते.अनेकदा पावती मिळत नसेल तर आपण ती
आवर्जून मागून घेतो. खरेतर पावती कशाकशाची मिळू शकते ? तर कशाचीही ...अगदी सहा
रुपयाचा चहा तुम्ही प्यायलात तरी तुम्ही पावती मागू शकता. बागेत आपण जातो तर तिथे
प्रवेशाला दोन रुपये असतात. आपण दोन रुपये देतो आणि ती बारकीशी पावती खिशात किंवा
पर्समध्ये टाकतो. काहीजण हातातच ती खेळवत राहतात आणि बागेतून बाहेर पडताना तिथेच
फाडून फेकून देतात.
वास्तविक पाहता आर्थिक व्यवहाराच्या
बाबतीत पावतीला अगदी अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि असायलाच हवे कारण त्यातून
व्यवहार पारदर्शी होतो.फसवणूक टाळता येते.पावती हरवली तर मात्र यातील काहीच होऊ
शकत नाही.पण मग नात्यांच्या हरवलेल्या आणि निसटून गेलेल्या पावत्यांचे काय!
तुम्हाला माहित आहे का ? जगात दोन
प्रकारची माणसे असतात ज्यांना प्रत्येक छोट्या गोष्टीची पावती लागते म्हणजे
त्यांनी काहीही केले आणि त्याची पावती मिळाली नाही तर ते अस्वस्थ होतात, आणि काही
जण खूप काही करत असतात आणि त्यांना पावतीची गरज वाटत नाही. व्यावहारिक जगातील
पावतीला असलेला अर्थ; भावनिक आणि नातेसंबंधाच्या जगात पूर्ण बदलून जातो कोणी कोणावर केलेल्या उत्कट प्रेमाची पावती मागता येत नाही . प्रत्येक नात खरेतर
मूल्यवान असते, त्या मध्ये देवाणघेवाण असते पण त्याचा हिशोब न ठेवलेलाच बरा.
व्यावहारिक जगात तुम्ही खर्च केलेल्या अगदी एक रुपयाचीही पावती मागता येते पण
भावनिक आणि नात्यांच्या जगात तुम्ही पावती मागूच शकत नाही. अनेकदा तर तुम्ही
दिलेली सेवा अमूल्य असते पण त्याची पावती नाही मिळत !! आपण सगळे अशा अनुभवातून जात
असतो. पावती मिळाली नाही की आपण अस्वस्थ होतो. आपण केलेल्या कष्टाचे,सेवेचे
अवमूल्यन झाले असे आपल्याला वाटते. असे वाटू नये असे वाटत असेल तर त्या बागेत
फिरणाऱ्या व्यक्तीप्रमाणे वागले पाहिजे, बागेतून बाहेर पडले की पावती फेकून
द्यायची..आपल्याला दुसऱ्यासाठी जे करायचे होते ते करून झाले की त्यातून बाहेर
पडायचे पावती मिळाली तर आनंद आहेच आणि नाही मिळाली तरी दु:ख नाही.या जगातील
पावत्या वेगळ्या असतात त्या कधी प्रेमळ आपुलकीच्या शब्दाने व्यक्त होतात तर
कधी, हलक्याच स्पर्शाने,कधी अनपेक्षित कटू शब्दाने तर केव्हा तुटलेल्या वा नवीनच
निर्माण झालेल्या स्नेह्बंधाने कधी अबोल नजरेने तर केव्हा अवखळ स्पर्शाने ...म्हणून व्यावहारिक जगातील पावतीचा आग्रह भावनिक आणि
नात्यांच्या जगात सोडून दिलेलाच बरा.
`
खूप सुंदर, आणि समर्पक!
ReplyDelete