शिक्का
त्यातल्या काहींवर असतो वेदनेचा एक शिक्का
जो काही केल्या मिटत नाही
कितीदा पुसावा? पण ओरखडा जात नाही!
आपल्या सहवासात चांगली वाईट अनेक प्रकारची माणसे येत असतात. काही माणसांना किंवा व्यक्तींना आपण स्वतःहून सामावून घेतो, काही व्यक्ती अनाहूतपणे आपल्यामध्ये शिरतात. पण एकूण आपल्या जीवनात माणसे नेहमीच मध्यवर्ती असतात.तरीही आपण त्यांना शिक्के मारत फिरत असतो.
आपल्यासारख्या गावात, शहरात राहणाऱ्या लोकांना माणसांपासून दूर राहून काही चालण्यासारखे नसते. अगदी एकटेपणा आवडणारा माणूसही त्याच्या दैनंदिन जीवनात काही प्रमाणात का होईना कुणावर तरी अवलंबून असतो. मानवी स्वभाव असं म्हणूयात हवे तर! हे असं एकमेकांवर अवलंबून असलेले आपले जीवन असूनही आपल्या सहवासात येणाऱ्या व्यक्तींना आपण कधी पटकन चांगलं म्हणतो असं होतं का? हा प्रश्न नेहमी माझ्या मनात येतो. नित्य सहवासात असलेली माणसे आणि कदाचित अगदी थोड्या वेळासाठी भेटलेली माणसे या सगळ्यांबद्दल काहीतरी मत द्यायला आपल्याला लगेच आवडते. सर्वसाधारणपणे समोरची व्यक्ती आपल्या विचारांची आवडीनिवडीची असली तर मत चांगले होते पण जर ती व्यक्ती तशी नसेल तर लगेच आपले शिक्के आपण उपसून काढतो आणि ठका ठक द्यायला लागतो. एखादा पोस्टमन जसा पत्रांचा गठ्ठा समोर आला की निवड सुरू करतो अगदी तसेच.. 'अमुक माणूस फार शहाणा आहे, तो दादा आगाऊ आहे, त्या बाई अतीच करतात, त्यांना वाटते जगातले सगळे ज्ञान त्यांनाच आहे गर्विष्ट कुठले...' न संपणारी मोठी यादी. दरवेळी आपण त्या व्यक्तीला काही म्हटलं पाहिजे असं खरं म्हणजे कुठे लिहिलेलं नाही पण कदाचित सगळ्यात स्वतःचं मत असलच पाहिजे असं वाटणारे आपण बोलल्याशिवाय राहूच शकत नाही. अर्थात काही सन्माननीय अपवाद असू शकतात.
प्रवास करताना, बाजारात, सिनेमा नाटकाला गेल्यावर आपण कान उघडे ठेवून लोकांचे संवाद ऐकले तर हे लगेच कळते. कोणीतरी नेहमी कोणातरी माणसाबद्दल तक्रारीच्या स्वरात बोलत असते. माणसांचा आपल्याला जर इतका त्रास होतो तर मग आपण माणसे गोळा का करतो ! मुळात जन्माला आल्या आल्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसे सप्रेम भेट म्हणून मिळतातच काळाच्या ओघात त्यातली हवीहवीशी वाटणारी काही निसटून जातात.काही नकोशी असली तरी सांभाळावी लागतात. हे कमी की काय म्हणून पुन्हा आपण हौसेने शेजारीपाजारी, मित्र, आप्त अशी नावे देत आणखी काही जणांना गोळा करतो. ही जर आपली आवड असेल माणसांची तर मग त्यांना नावे का ठेवावीत? ती असतील तशी स्वीकारायला हवीत कारण ती तुम्ही जमवलेली असतात. त्यांना नाव ठेवण्यापेक्षा अगदीच एखादी गोष्ट गैर वाटली तर ती बदलायचा प्रयत्न करणं हे जास्त चांगलं आहे.
आपण जेव्हा एखाद्याला सह्जच नावे ठेवतो तेव्हा कारण नसताना त्या व्यक्तीवर विशिष्ट आरोप करत असतो हे आपल्या लक्षातही येत नाही. जो कदाचित असत्य असू शकतो. त्यामुळे आपण हौसेने जमवलेल्या माणसांना आहे तसे संपूर्ण स्वीकारणे व मनातील शिक्क्यांना कधी मधी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे, तुम्हाला दिसत नसले तरी तुमच्याही पाठीवर एखादा शिक्का नक्कीच असतो यात शंका नको.
Comments
Post a Comment