देव, दैव की अपेक्षेसह कर्म बरे ?
देव ,दैव की अपेक्षेसह कर्म बरे ?
जगात दोन प्रकारची माणसे असतात. काहीजण कर्मावर विश्वास ठेवणारी असतात तर काही नशिबाच्या आहारी जातात. दोन्ही प्रकारे बघायचे म्हंटले तरी सुख आणि दुःख असते ते दोघांच्याही वाट्याला येत असतेच. 'यश मिळाले तर ते माझे आणि अपयश मिळाले तर ते दुसर्यांमुळे', ' मी आनंदी माझ्यामुळे आणि मी दुःखी इतरांमुळे' असे गणित मांडणारी अनेक माणसे असतात. 'नशीब' आणि 'कर्म' या फार वेगळ्या गोष्टी आहेत. भर्तृहरी सारखा संस्कृत कवी म्हणतो ' देवांना नमावे तर ते स्वतः विधिच्या अंकित असतात तेव्हा विधिला वंदावे हे बरे, पण ज्याच्या त्याच्या कर्माला अनुसरून नियती देत असते त्यामुळे विधी हे कर्माच्या अधीन मानले जातात .असे जर असेल तर 'देव' व 'विधी' म्हणजे नशीब यांचे काही महत्त्व उरत नाही. म्हणून विधीसुद्धा ज्याच्यापुढे हतबल ठरतो त्या कर्माला आपण वंदूया.'
कोणतेही कर्म करताना त्याबद्दल अपेक्षा ठेवू नये असे सांगितले जाते. परंतु काहीतरी अपेक्षा ठेवून कर्म केले तर ते कदाचित अधिक प्रामाणिकपणे होते का? असेही मनात येते. जगात अपेक्षा ठेवायच्या नाहीत तर मग कोणतीही गोष्ट करावी कशाला असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यातून एक प्रकारचा आळस किंवा निराशा जन्माला येते. व्यक्ती चांगल्या-वाईट सगळ्या गोष्टींचा भार परमेश्वराच्या पाठीवर किंवा नशिबावर टाकायला लागते. आता परमेश्वर काय आणि नशीब काय दोन्ही गोष्टी न दिसणाऱ्या.त्यामुळे विश्वास नक्की ठेवायचा कशावर? त्यातल्या त्यात देव बरा कारण माणसाच्या मनातून तो मूर्तीमध्ये तरी उतरला आहे आणि सगुण साकार झालाय .... ज्या परमेश्वरावर अनेकांचा विश्वास आहे ,ज्याला साक्षी मानून अनेक व्यक्ती आयुष्यातील बऱ्या वाईट प्रसंगांचा सामना करतात तो खरतर त्यांचाच आतला आवाज असतो.पण, स्वतःला कसलेही श्रेय घ्यायचे नाही असा जो आग्रह असतो त्यामुळे अनेकदा देवगुणी माणसे चांगल्या वाईट प्रसंगात म्हणतात देवाची कृपा! स्वतःचे कर्तृत्व ती सहज नाकारतात.
देवाइतकाच किंबहुना देवापेक्षा जरा जास्तच नशिबावर विश्वास ठेवणारी माणसे आपल्या सभोवती असतात. नशीब या शब्दाच्या वास्तविक निरनिराळ्या छटा आहेत. सहजच एखादी गोष्ट मनाजोगी झाली की नशीब चांगले असते, जरा वेगळे काही झाले तर नशीब फुटके असते..काही माणसे म्हणे कमनशिबी असतात !तर काहींचे नशीब बलवत्तर असते.ज्याला आपण नशीब म्हणतो ते असते तरी काय? देव आणि नशीब यांची जोडणी करण्यात गुंतलेली अनेक माणसे आपल्या अवतीभोवती असतात त्यांचे गुंते कधी सुटतात की नाही शोधणे अवघड आहे.
त्यामुळे देंव आणि नशीब यामध्ये न गुंतता सतत कर्मरत राहणारी माणसे अधिक चांगली नाही का? अडचण एकच असते अशा कर्मरत राहणाऱ्या व्यक्तिंना फळाची अपेक्षा न ठेवता कर्म कर अस म्हंटले की कर्म करण्याची प्रेरणा कमी जास्त होते. सर्वसाधारण कोणीही सामान्य व्यक्ती ज्या प्रामाणिकपणे एखादी चांगली गोष्ट करते तेव्हा तिची त्या बदल्यात निदान दोन चांगले शब्द मिळावेत अशी अपेक्षा असते असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे.नेमके अशावेळी आजूबाजूची लोकं 'अळीमिळी गुपचिळी' करत त्या व्यक्तिचा मनोभंग करतात. असे का व्हावे? काहीच न करण्यापेक्षा काही अपेक्षा ठेवून कर्म करण्यात वाईट काय आहे? ' दे रे हरी पलंगावरी' म्हणण्यापेक्षा मी अमुक गोष्ट करीन पण मला अमुक मिळाले पाहिजे असं म्हणणाऱ्याच्या हातून काहीतरी का होईना घडते. कोणतेही कर्म फळाच्या अपेक्षेने करू नये असे म्हणणे योग्य आहे खरे; पण माणसाच्या जीवनात अपेक्षाच नसतील तर जगण्याचा अर्थच संपून जातो. असं फार तर म्हणता येईल की माझी अपेक्षा इतरांच्या उन्नतीला अहितकारक ठरणारी असू नये, माझ्या अपेक्षे मुळे इतरांचे नुकसान होऊ नये. त्यामुळे देव किंवा दैव यांवर विसंबून राहण्यापेक्षा छोटी अपेक्षा ठेवून का होईना कर्मरत राहणे जास्त सुखावह नाही का?
हो खर आहे आपण आपल कर्म करत राहू खूप छान लिहिल आहेस कळतं पण वळत नाही अशी गत आहे आपली
ReplyDelete