पसायदान ज्ञानेशाचे..

                अतीव अवहेलना आणि दुःख सहन करूनही ज्ञानदेवांच्या मुखातून पसायदान कसे उमटले! माणसाच्या जगण्याचा आधार सुटतो तेव्हा सर्वात प्रथम समाज त्याला एकटा पडतो. त्याच्यातील असलेल्या आणि कदाचित नसलेल्याही उणेपणाची जाणीव त्याला प्रकर्षाने करून देतो. समाज म्हणजे एक सामूहिक मानसिकता असलेला गट. या गटाला स्वतःचे भान विसरून जगायला आवडते कारण तसे वागले की जे काही घडेल अथवा बिघडेल त्याची जबाबदारी समूहावर येते.व्यक्तींची एक अर्थाने त्यातून सुटका होते. यासाठीच समाजभान हा शब्द खूप अर्थ घेऊन येतो.
                संन्याशाच्या पोरांची समाजाने अवहेलना केलीतेव्हा  या  मुलांना त्यांची काहीच चूक नसताना  शिक्षा भोगायला लागली तेही अशा निरागस वयात की जेव्हा त्यांना समाजाच्या आधाराची गरज होती. . नेमके या विश्वासालाच तडा जाईल असे अनुभव त्यांना आले. ज्याचा परिणाम म्हणून उद्विग्नता, राग, नैराश्य, संताप यांनी एखाद्याचे मन भरून जाईल. पण ज्ञानदेवांच्या  जीवनात रागाला जणू जागाच नव्हती! एकदाच रागावून झोपडीचे दार ते लावून बसले  आणि ती  लहानगी मुक्ता मोठ्या दादाला उपदेश करत म्हणाली, 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा' एव्हढे जाणतेपण कोठून आले असेल त्या लहानग्या मुलीमध्ये आणि तिचा दादा तरी किती आगळावेगळा त्याने ताटीचे दार उघडले म्हणजे जणू ज्ञानचक्षू उघडले. समाजाला बदलायला हवे होते आणि ते दुसरे कोण बदलणार? त्या जाणत्या युवकाने ही धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. अवघ्या सोळाव्या वर्षी ईश्वराला समर्पित केलेली ज्ञानेश्वरी निर्माण झाली ती त्याच समाजासाठी ज्या समाजाने ज्ञानदेवांना आणि त्यांच्या भावंडाना नाकारले होते.अतीव दुःख दिले होते, आणि असे असूनही पसायदानाची निर्मिती झाली.
              ज्यांनी त्यांना  स्विकारले  त्यांनाच  नाहीतर ज्यांनी त्यांना  नाकारले त्या सर्वांसाठी भरभरून ज्ञानदेवांनी मागितलेपरमेश्वराची वाग्यज्ञरुपी उपासना करून त्याला संतुष्ट केले म्हणजे समाजमनातील देवत्वाला जणू हाक दिली. त्यांनी परमेश्वराकडे भरभरून जे मागितले ते स्वतःसाठी नाही तर अखिल मानवजातीसाठी ! दुष्ट दुर्जनांचा नाश होवो अस म्हणता ते म्हणाले त्यांना सत्कर्माची गोडी लागो, भूतमात्रात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होवोत.अंधार नष्ट होवो आणि तेजाचा सूर्य प्रकाशमान होवो.ईश्वरार्पण मन- बुद्धितूनच हे घडू शकते.अन्यथा ज्या व्यक्तीला समाजाचा अन्याय,रोष सहन करावा लागला आहे तिच्या मुखातून हे उमटू शकते का? लांच्छन विरहित चंद्र आणि उष्णतेविरहीत सूर्य ! किती किती मागावे एखाद्याने ! तेही स्वतःसाठी काहीच नाही..हे सर्व इतरांना मिळावे म्हणून आर्त प्रार्थना आहे. सर्वांना सगळे मिळाले तरच तो ज्ञानदेव सुखी होणार आहे..
            असे म्हणतात कोवळ्या वयात बसलेले चटके,त्यांच्या खुणा कधीच नष्ट होत नाहीत परिस्थितीवरच्या रागापोटी पावले चुकीचा मार्ग अवलंबतात.जे मला मिळू शकले नाही ते कोणालाच मिळायला नको अशी तीव्र भावना निर्माण होते आणि मन सूडाने तर कधी अगतिकता ,दैन्य ,निराशेने भरून जाते.मग ज्ञानदेवांच्या मनात इतकी अपार करुणा कशी निर्माण झाली? या प्रश्नाचे उत्तर शोधणे मोठे अवघड आहे .. क्षमेने आणि कारुण्याने  भरलेल्या मनालाच हे शक्य आहे. आज मी जेव्हा माझ्या आत डोकावून बघते तेव्हा वाटते आपले मन असे क्षमेने आणि करुणेने भरता येईल का? जीवनात स्वतःची अशी उदात्त पाउलवाट  नाही निर्माण करता आली  तरी ज्यांनी ही पाउलवाट निर्माण केली त्या पाऊलवाटेन एक तरी पाउल चालता आले तरी बरच काही मिळवले असं होईल ना..माझ भान कधीही न सुटुदे  हीच प्राथना .

Comments