पावती मिळाली
कोऱ्या कागदावर त्याने उमटविला एक कधीही न पुसता येणारा ठसा आणि चार अक्षरे सहीची ...ही घे पावती नि:शब्दपणे मी तो कागद उचलला ती पावती होती? की संपलेल्या नात्याची निशाणी ! आजपर्यंत केलेल्या प्रेमाची,वाहिलेल्या वेदनांची झालर होती त्या सुरकुतलेल्या कागदाला, कागद? कोरड्या मनाने खरडलेल्या सहीच्या आजूबाजूला नव्हती कसलीच निशाणी आपल्या नात्याची.... व्यावहारिक जगात एखादी गोष्ट अथवा व्यवहार पूर्ण झाल्यावर आपल्याला पावती मिळते.अनेकदा पावती मिळत नसेल तर आपण ती आवर्जून मागून घेतो. खरेतर पावती कशाकशाची मिळू शकते ? तर कशाचीही ...अगदी सहा रुपयाचा चहा तुम्ही प्यायलात तरी तुम्ही पावती मागू शकता. बागेत आपण जातो तर तिथे प्रवेशाला दोन रुपये असतात. आपण दोन रुपये देतो आणि ती बारकीशी पावती खिशात किंवा पर्समध्ये टाकतो. काहीजण हातातच ती खेळवत राहतात आणि बागेतून बाहेर पडताना तिथेच फाडून फेकून देतात. वास्तविक पाहता आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत पावतीला अगदी अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि असायलाच हवे कारण त्यातून व्यवहार पारदर्शी होतो.फसवणूक टाळता येते.पावती हरवली तर मात्र यातील काहीच होऊ शकत नाही.पण...